प्रवासवर्णन : गिरनार, गीर व सोमनाथ मंदिर

Title photo

सौराष्ट्रात जुनागड शहराच्या पूर्वेस गिरनार पर्वत आहेत. गिरनार हे एक पवित्र ठिकाण आहे. येथे हिंदू व जैन धर्माची देवस्थाने आहेत. कॉलेजातील दिनक्रमाचा कंटाळा आला होता व दूर कुठेतरी फिरावयास जावे असा विचार आम्हा मित्रांचा मनात आला व शेवटी गिरनारला जायचे निश्चित झाले. एवढ्या दूरवर जाणारच आहोत तर गीर जंगलात सिंहाची भेट घ्यावी आणि सोमनाथ मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे असे आम्ही ठरवले.

गिरनारच्या पायथ्याचे शहर जुनागड. जुनागडला जायला मुंबई व पुण्याहून रेल्वेच्या गाड्या तसेच बस सुद्धा आहेत. जुनागड शहर, गुजरात प्रांतातील इतर महत्वाच्या शहरांशी रेल्वे व बस ने जोडले आहे.

जुनागड वरून गिरनारला जायला रिक्षाची सोय सकाळी ४ वाजल्या पासून उपलब्ध आहे. गिरनार पर्वतावर सर्वात वरच्या डोंगरावर दत्त मंदिर आहे. पायथ्या पासून मंदिरापर्यंत १० हजार पायऱ्या आहेत. पायथ्या पासून ते शिखरापर्यंत ज्या लोकांना चढण्याचा त्रास होतो अशा लोकांकरिता डोलीची व्यवस्था आहे. पर्वताच्या पायथ्याशी व साधारण पहिल्या १०० पायर्यांपर्यंत बरीच दुकानं आहेत. या दुकानांमध्ये पाणी, बिस्कीट व इतर खाण्याचे पदार्थ मिळतात.

DSCN75892

काळोखात दिव्यांमुळे लकलकणारे जुनागड शहर

गिरनार पर्वत शक्यतो काळोखातच चढायला सुरवात करावा. डोक्यावर ऊन येण्या अगोदर जास्तीत जास्त चढून घ्यावा. काळोखात चढताना, थोडी उंची गाठल्यावर जुनागड शहर दिसते. शहरातील दिव्यांमुळे आकाशातील चांदणे खाली उतरले आहेत असे वाटते. आकाशात पाहिले तरी चांदण्या दिसतात आणि खाली पाहिले तरी चांदण्याच दिसतात. जणू काही दिवाळीच आहे, असा भास होतो. काही वेळाने अचानक सूर्य आपले डोके बाहेर काढतो आणि सर्व दृश्यच बदलून जाते. आता खेळ सुरु होतो तो ढगांचा आणि डोंगरांचा. सभोवतील डोंगरांच्या शिखरावर विराजमान झालेल्या ढगांमुळे सारे दृश्य आल्हाददायक होते. ह्या दृश्याची कितीही छायाचित्रे काढावीत तरी ती कमीच आणि जी मजा हे दृश्य प्रत्यक्ष पाहण्यात येते ती कॅमेराच्या लेन्स मध्ये कैद करणे अशक्यच.

साधारण ४००० पायऱ्या चढल्यावर जैन मंदिर लागते. जैन मंदिर फार भव्य आहे. मंदिरात इतकी शांतता आहे कि तेथेच ध्यान करत बसावे असे वाटते. मंदिराच्या बाजूला अजून काही जैन धर्माची देवस्थाने आहेत. या सर्व मंदिरांचे बांधकाम अतिशय रेखीव आहे.

DSCN7679

जैन मंदिर व बाजूच्या इमारतींचे वरून काढलेले छायाचित्र

DSCN7733

दत्त मंदिराचा सुळका DSCN7745

दत्त मंदिराचा सुळका चढतानाचा कठीण चढ

जैन मंदिराच्या पुढे साधारण १०० पायऱ्यांनंतर अंबाजी देवीचे मंदिर आहे. अंबाजी मंदिरानंतर किंचित उतार सुरु होतो आणि पुढे परत चढ लागतो. चढ संपल्यावर गोरखनाथांचा मठ आहे. मठाच्या पुढे गेल्यावर समोर एक सुळका दिसतो. प्रथमदर्शनी तो अतिशय भयावह वाटतो. या सुळक्याच्या शिखरावर पोहोचणे अशक्यच वाटते. याच शिखरावर दत्त मंदिर आहे. प्रचंड उतार आणि त्यानंतर अतिशय दमवणारे चढण झाल्यावर दत्त मंदिराचा प्रवेश येतो. दत्त मंदिर छोटेसे असले तरी सुबक आहे. मंदिरात दत्तात्रयांच्या पादुका आहेत. मंदिरात जास्त जागा नसल्यामुळे दर्शन झाल्यावर फार वेळ थांबता येत नाही. परत जाताना दत्तमंदिरापासून अंबाजी देवीच्या देवळापर्यंतचा चढ अतिशय थकवणारा आहे.

गिरनार पर्वतावर जाऊन आल्यावर विश्रांती घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी गीर जंगलात जायला निघालो.

गीर जंगल हे त्यातील सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. जंगल सफारीची सुरवात सासण नावाच्या गावातून होते. Open jeep मधून सफारी करायची असल्यास ३ दिवस आधीपासून Online Booking करावे लागते. जंगल सफारी मध्ये जास्तीत जास्त प्राणी दिसावेत या साठी अतिआवश्यक जर काही असेल तर ते म्हणजे नशीब. आणि त्यादिवशी आमचे नशीब फारच जोरात होते. आम्हाला १ सोडून ४ सिंहीण दिसल्या.

DSCN7790

त्यातील एक सिंहीण तर आमच्या jeep समोरुन चालत गेली. त्या जंगलाच्या महाराणीने आमची दखल सुद्धा घेतली नाही. आमच्या समोरून जाताना त्या सिंहिणीला एक हरीण दिसले आणि चक्क आमच्या डोळ्यासमोर ती त्या हरणाची शिकार करायला सरसावली. हरणाचे नशीब चांगले कि त्याला ती सिंहीण वेळेत दिसली आणि ते पळून गेले. सिंहीणीचे ते रौद्र रूप पाहून आमच्या मनात आनंद, रोमांच, विस्मय, आदर, आणि भीती अशा विविध भावना उमटल्या. या जंगलात साधारण ५२० सिंह आहेत. त्यांच्याबरोबर इतर ही काही प्राणी आहेत. जागोजागी सुंदर मोर दर्शन देतात, हरणांचे कळप सुद्धा सतत दिसतच असतात.

RSCN7839

DSCN7785

गीरच्या राणीशी भेट झाल्यावर आम्ही १२ जोतिर्लिंगांपैकी १ असणाऱ्या सोमनाथ मंदिराच्या दिशेने वळलो. सासण पासून साधारण ५० किलोमीटर वर सोमनाथ गाव आहे. सोमनाथ गावाच्या समुद्रकिनारी सोमनाथ मंदिर आहे. सरदार वल्लभभाई पटेलांनी पुनर्स्थापित केलेले हे देवस्थान अतिशय भव्य आणि दिमाखदार आहे. गावात मंदिराच्या ट्रस्ट ने राहण्यासाठी हॉटेल्सची सोय केली आहे. त्यापैकी एका हॉटेलचे नाव आहे ‘सागर दर्शन ‘. अगदी नावाप्रमाणेच हे हॉटेल आहे. हॉटेलच्या खिडकीतून समुद्राचे सुंदर दर्शन होते. सायंकाळी सूर्यास्त इतका सुंदर दिसतो कि ते दृश्य डोळ्यात भरून ठेवावेसे वाटते. सोमनाथ मंदिर व मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. मोठे नावाजलेले देवस्थान असूनही स्वच्छता उत्तम आहे. मंदिराच्या आवारात सर्व ज्योतिर्लिंगांची माहिती लिहिलेली आहे. मंदिराच्या समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला बसण्याची व्यवस्था आहे. तेथे समुद्राचा वारा अंगावर घेत बसले कि फार प्रसन्न वाटते.

DSCN7975

DSCN7890

DSCN7968

सोमनाथ येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा

DSCN7932

सागरदर्शन मधून दिसलेला सूर्यास्त

देवाचे दर्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही वेरावळ नावाच्या गावाला गेलो. वेरावळ सोमनाथ गावापासून ७ किलोमीटर वर आहे. वेरावळहून मुंबईला जाणारी ट्रेन सुटते. ट्रेन मध्ये बसून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आणि ही एक अविस्मरणीय सहल संपली.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s