माझे superheroes

 

काही दिवसांपूर्वी, एका विख्यात इंग्रजी comic book लेखकाचे निधन झाले. त्या लेखकाचे नाव Stan Lee.   Stan Lee च्या लेखणीतून, Marvel विश्वातील superheroes चा निर्माण झाला आहे. Iron Man, Hulk, SpiderMan हे सर्वांचे लाडके superheroes निर्माण करण्याचं श्रेय Stan Lee चे आहे.  Stan Lee ह्यांनी लिहिलेल्या ह्या superheroes च्या गोष्टींमध्ये, त्या superheroes कडे कितीही अमानवी शक्ती असल्या तरी त्यांच्या व्यक्तिमत्वात मानवी भाव रेखाटलेले दिसतात. त्यामुळेच त्यांच्या गोष्टी मनाला कुठेतरी भावतात आणि लोकप्रिय होतात. SpiderMan मधले ‘With great power comes great responsibility’ हे वाक्य खूप काही शिकवून जातं. सध्या Stan Lee लिखित ह्या गोष्टींच्या आधारावर सरासरी दर वर्षी एक नविन चित्रपट सादर होतो. मोठ्या संखेने लहान मुलंच नव्हेत तर माझ्यासारखी तरुण मंडळी देखील आतुरतेने ह्या चित्रपटांची वाट पाहत असतात. SpiderMan म्हणा, Iron Man म्हणा, Avengers, एक भली मोठी यादीच आहे. यादी नव्हे, एक मोठं यशस्वी विश्व आहे हे, Marvel नावाचं. ह्या विश्वशी स्पर्धा करणारे आणखी एक असेच विश्व आहे ते म्हणजे D.C Universe.

Superman, Batman, Flash आणि इतर बरेच superheroes D.C विश्वात जगतात. Marvel आणि D.C ह्या २ विश्वात असलेल्या स्पर्धेमुळे, त्या विश्वांच्या चाहत्यांमध्ये सुद्धा खूप वाद असतात. सामन्यतः, अशा काल्पनिक व्यक्तींना खरं मानून त्यांच्या आहारी जाणं हे लहान मुलांसाठी ठीक आहे, पण college मधली आणि मोठ्या offices मध्ये कामाला लागलेली लोकं सुद्धा ह्या सगळ्या प्रकाराची ‘फॅन’ आहेत. आत्ताच एका नवीन सिनेमाचा trailer प्रदर्शित झाला आहे. Social Media वर सगळीकडे ह्याची चर्चां सुरू आहे, नवीन चित्रपट आला की त्याचं विश्लेषण, काही गोष्टी तशा का झाल्या, तो hero तसा का वागला, कुठल्यातरी superhero च्या मरणाने किंवा त्यागाने एक हळहळ व्यक्त होते. ही सगळी चर्चा, वाद, भांडणं, हळहळ, शाळा-कॉलेजसच्या वर्गांमध्ये, offices मध्ये, whatsapp groups मध्ये चालू राहते.

ह्या सगळ्याचा उत आला आहे असं मला वाटते. म्हणजे, comic book वाचू नयेत असं माझं मत नाही, किंवा हे चित्रपट बघू नये असही मला म्हणायचे नाही, मनोरंजनासाठी चित्रपट बघणे मुळीच गैर नाही आणि जे वाचून ज्ञान, शब्दकोश, बोध मिळेल असे काहीही वाचावे अशा मताचा मी आहे पण ह्या काल्पनिक गोष्टींमध्ये हरवून इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे मला योग्य वाटत नाही. प्रेरणा घ्यावी, आदर्श मानावेत अशा कितीतरी व्यक्ती आहेत. दुर्दैवाने ह्या अशा व्यक्ती वर्तमानात नहीत. पण अशा व्यक्ती भूतकाळात नक्कीच आहेत. अशा लोकांची यादी काढली तर marvel काय आणि D.C काय, कुठल्याही विश्वाला लाजवेल इतकी मोठी यादी निघेल.

ज्यांच्या चरित्रात हरवून जावं अशी कितीतरी माणसं आपल्या इतिहासात आहेत.

आत्ता लिहिताना एक नाव सतत मनात येत आहे. त्याग, शौर्य, अमानवी पराक्रम करणाऱ्या व्यक्तीचे हे नाव. पाश्चात्य, काल्पनिक गोष्टींमध्ये हरवलेल्या माणसांनी हे नाव ऐकले सुद्धा नसेल. शिवरायांच्या एका सरदाराचं नाव हे, सध्या ICSE, CBSE चे फॅड आहे, त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये शिवरायांनाच जेम तेम कुठेतरी स्थान मिळते तर तिथे त्यांच्या माणसांना कुठुन मिळणार जागा! घरात इतिहासाची रुची असणारी माणसं असतील तरच बाजी प्रभू देशपांड्यांचे नाव कानावर पडले असेल! किती थोर हा माणूस! बाजी प्रभूंचे चरित्र वाचताना, ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही! Stan Lee ने शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला असता ( त्यांनी तो वाचला होता असे कुठे ऐकिवात नाही) तर त्यांना ही मान्य करावे लागले असते की बाजी प्रभू आणि त्यांच्यासारख्या शिवरायांच्या इतर माणसां इतके महान superheroes कोणत्याही विश्वात नाहीत.

महाराज पन्हाळ्यावरून सुटून विशाळगडाकडे जात असताना सिद्दी मसूद हजारोंची फौज घेऊन त्यांचा पाठलाग करत होता, महाराज सुखरूप पोचावे ह्या उद्देशाने बाजी प्रभू मसूदला रोखण्यासाठी ६०० मावळ्यांसहित खिंडीत उतरले. महाराज सुखरूप विशाळगडी पोहोचले की तोफांचे बार उडवायला बाजी प्रभूंनी सांगितले.

बाजी प्रभुंसारख्या पराक्रमी पुरुषाला मोगलाईत किंवा आदिलशाहीत मोठी मनसब, जहागीर मिळाली असती. सबंध आयुष्य त्यांनी सुखात आणि ऐशो आरामात काढलं असतं. पण नाही, त्यांनी पराक्रम गाजवला तो आपल्या राज्यासाठी. खिंडीत उतरताना त्यांना माहीत होतं की मृत्यू अटळ आहे इथे, तरीही ते उतरले, ढाल न घेता दोन्ही हातात दाणपट्टे घेऊन उतरले. काय गरज होती त्यांना हे करायची, कोणी सांगितलं होतं? त्यांनी सुद्धा झटकून दिलं असतं, ते म्हणाले असते, आपल्या सोबत राजे आहेत ते बघून घेतील काय करायचं ते, आपण कशाला जायचं उगाच मरायला. पण ते मृत्युच्या गुहेत गेले, स्वतःहून चालत गेले. इतर सोप्पे, सौख्याचे पर्याय डावलून गेले.

त्यांच्या मनात तेव्हा काय चालू असेल ह्याचा अंदाज लावणं अशक्यच. तात्याराव सावरकरांनी लिहिलंय तेच बाजी प्रभूंच्या मनात असेल, तात्याराव लिहितात, ‘तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला’.

कसे फेडणार आपण बाजींचे अपल्यावरचे ऋण? स्वराज्य उभं रहावं, आपल्या माणसांचं राज्य व्हावं, पुढील पिढी स्वतंत्र व्हावी म्हणून ही माणसं खर्च झाली आणि आपण त्यांना विसरत चाललो आहोत! त्यांचं काम आपण पुढे नेत नाही आहोत. सरकार काही करेल आणि देशाची उन्नत्ती होईल अशी आपली अपेक्षा झाली आहे, देशाच्या उन्नत्ती करिता फक्त सरकार नाही तर प्रत्येक सक्षम नागरिकाने हातभार लावणं आवश्यक आहे. त्या काळी प्रत्येक जणाने, शिवाजी महाराजांचा असो किंवा ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य संग्रामातला असो, ह्याच विश्वासाने आयुष्याचा त्याग केला की आपण राष्ट्राला स्वतंत्र करण्यात झटलो तर आपली पुढची पिढी राष्ट्रउन्नत्ती साठी झटेल.

पण आम्हा तरुण मुलांना सगळ्यात जास्त आकर्षण आहे ते पाश्चात्य देशांचे, तिथले जीवन, तिथल्या सुख सोयी, मिळवता येणारा पैसा वगैरे. अशा आम्हा तरुणांना काय कळणार बाजी प्रभूंचे, मुरारबाजीचे, तानाजीचे आणि अशा असंख्य व्यक्तींचे मन, ज्यांनी परकीयांकडून मिळणाऱ्या धन दौलतीवर लाथ मारून स्वराज्य आणि स्वलोकांसाठी मरणं आणि झटणं स्वीकारलं? उलट त्यांचं मन जाणून घेण्या ऐवजी आजचं आमचं स्वैराचाराने गंजलेले मन त्यांना मूर्ख आणि अपयशी ठरवेल!

पण कदाचित ह्याचा दोष आमच्या आजच्या तरुणा इतकाच पालकांचा देखील आहे. ज्या वयात बाजी प्रभूंसारख्या माणसांच्या गोष्टी सांगायच्या त्या वयात SpiderMan आणि Batman ची कार्टूनं आणि सिनेमे दाखवले गेले (पुन्हा, ते दाखवलं ह्या बद्दल आक्षेप नाही तर फक्त तेच दाखवलं ह्यावर आहे). पाश्चात्य गोष्टी दाखवून तिथलेच आकर्षण वाढवण्यात आलं. मार्कंसाठी आपल्या मुलांकडून करून घेतलेल्या रट्ट्यात सुद्धा बाजींना स्थान नव्हतं! मग कशी पोहोचणार ही माणसं आमच्यापर्यंत?

चित्रपटातुन म्हणायचं झालं तर, मराठी निर्मात्यांकडे तितके भांडवल आहे का ह्यावर प्रश्नचिन्ह आहे, हिंदी सिनेसृष्टी जिला कौतुकाने bollywood म्हंटलं जातं, त्यात काही बोटावर मोजण्या इतकी माणसं सोडली तर, ती एक बहकलेल्या माणसांची टोळी वाटते. त्यांनी आधीच पेशवे बाजीरावांना एका पायावर उभं राहून थिल्लर नाच करताना दाखवले आहे, त्यांनी ह्या विषयात हात न घतलेलाच बरा..

कदाचित, एक दिवस Hollywood मधला Christopher Nolan सारखा कोणतातरी दिग्दर्शक आपला इतिहास वाचेल आणि त्याच्यावर चित्रपट बनवेल, आणि मग आपल्या लक्षात येईल की रोमांचक कथा, असामान्य माणसं, आणि प्रेरणेसाठी कुठल्या काल्पनिक जगात हरवायची गरज नाही!

लेख संपवताना परत तात्याराव सावरकरांचे शब्द आठवतात,

‘श्री बाजीने रक्त पेरले खिंडीत त्या काला, म्हणुनी रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला.’

तात्याराव पुढे लिहितात,

‘अहो बंधुनो, पूर्वज ऐसे स्वतंत्र रणकाजी, स्वतंत्र त्या पूर्वजांस शोभतो वंशज का आजी!?’

 

7 thoughts on “माझे superheroes

  1. Fake Super hero aivaji baji prabhun sarkhe real heroes pudhe aale tar itihas hi jivanta rahil Ani Navin pidhivar Jara bare sanskar hotil .

    Atishay uttam Ani muddesud likhan 👌

    Aani ha vishay nivadlya baddal abhinandan 👍

    Liked by 1 person

    1. Thanks Ashish..
      ह्या सर्व महापुरुषांचे चरित्र आता सगळ्यांपुढे आदर्श म्हणून उभं राहिलं पाहिजे..
      आपल्या सतत चाललेल्या विविध विषयांवरच्या चर्चेमुळेच हे असे विषय सुचतात..

      Like

  2. ईशान, तू खूपच छान लिहिले आहेस..
    आपल्या भारत भूमीत बरेच वीर होऊन गेले. केवळ व केवळ त्यांच्यामुळेच आपण येथवर पोहोचलो. त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान आपण विसरता कामा नये… पण.. सध्याची बहुतांश पिढी इतिहास का वाचवा ह्या विचाराची आहे.. हा लेख वाचल्यावर ह्यांचामुळेच/इतिहासमुळेच आपले अस्तित्व आहे हे काळल्यावाचून राहणार नाही. नक्कीच आजकालच्या तरुण पिढीसाठी जळजळीत अंजन…
    तू असंच प्रेरणादायी लिहित जा..
    – किरात सुशील सावंत (अंधेरी)

    Liked by 1 person

  3. प्रिय ईशान,
    मला हा तुझा लेख मनापासून आवडला. प्रथम आजच्या घडीला तुझ्यासारखा तरूण मुलगा इतक्या चांगल्या मराठी भाषेत स्वतःचे विचार इतक्या प्रभावीपणे व्यक्त करू शकतो याबद्दल तुझे, तुझ्या पालकांचे आणि आजी आजोबांचे एकत्रित अभिनंदन मला करावेसे वाटते. त्यांच्या संस्कारांमुळे आणि त्यांच्या परिश्रमांमुळे तू आज तुझे विचार मातृभाषेतून सहजगत्या मांडू शकत आहेस. मी आणि तुझी आई एकाच शाळेत बारा वर्षे एकत्र शिकलो आहोत.

    काल्पनिक पात्रे आणि कार्टून्स यांनी गेल्या तीन दशकांपासून लहान मुलांच्या मनांचा कब्जा घेतला आहे. पण तू त्यातून बाहेर पडून काहीतरी चुकतंय हे उमजून उमगून चूक नेमकी कशी आणि कुठे आहे ते या लेखात उकलून दाखवले आहेस. मला ते खूप भावले. मला तुझे खूप कौतूक करावेसे वाटते.
    जो पर्यंत आपल्या मनात पोकळी असते तो पर्यंत आपण बेचैन असतो. एकदा का काही ठोस विचार किंवा ध्येय किंवा आदर्श आपलासा झाला की आपण त्याने पछाडले जातो. मग त्याचीच आपल्याला झिंग चढायला सुरुवात होते. तू अशा साक्षात्कारी क्षणाच्या अगदी समीप येऊन ठेपला आहेस असे मला मनोमन वाटते.
    तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मी ह्रदयपूर्वक आशीर्वाद देतो.
    अमोघ घैसास

    Liked by 1 person

  4. प्रत्येक राज्यात तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे सारखे वीर येऊन गेले. तर मला असं वाटतंय की त्या राज्यांचे सरकारने आपली इतिहास मुलांकडे घेऊन जायला चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. होलीवुडच्या चित्रपटांबरोबर उभं राहून मुलांचं आकर्षण ओढून घ्यायला खूप मेहनत लागणार आहे.

    Like

Leave a comment